अॅसिडिटी
Hyper-Acidity (GERD) अॅसिडिटी हा सर्वांचा परिचयाचा रोग. प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी अॅसिडिटी ची तक्रार जाणवलीच असेल.
हायपर अॅसिडिटी म्हणजेच आम्लपित्त ही बहुतांश लोकांची नेहमीची तक्रार असते. अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी पित्ताचा त्रास सुरू होतो.
ब-याच जणांना पित्त हा घटकच शरीरातून निघून जावा असे वाटत असते. पण मानवी शरीरात पित्ताचे पचनाचे कार्य फार महत्वाचे आहे. जठराचे निर्जंतुकीकरण करण्यापासून तर खाल्लेल्या अन्नाचे सूक्ष्मातिसूक्ष्म पचन घडवून आणण्याचे काम जठरातील पित्त (HCL Pepsin) हे प्रामुख्याने करीत असते. यामुळेच पित्त हा घटक शरीरासाठी महत्त्वाचा असतो.
परंतु जेव्हा खाल्लेले अन्न व जठरात स्त्रावलेले पित्त यांचा जेव्हा समतोल बिघडतो तेव्हा आम्लपित्त (Hyper-Acidity) होते, त्याला वैद्यकीय भाषेत GERD (Gastro EsophagealReflux Disease)असे संबोधले जाते.
GERD प्रक्रिया
- अन्ननलिकेच्या खालच्या भागातील स्नायू (LOS) ढिले होतात.
- यामुळे जठरातील पित्त (Acid) अन्ननलिकेमध्ये प्रवेश करते.
- हे स्त्रावलेले पित्त अन्ननलिकेच्या भिंतीवर सतत घर्षण करते, यामुळे अन्ननलिकेला सूज येऊन रूग्णाला खालील लक्षणे दिसतात.
लक्षणे
- छातीत जळजळ होणे.
- आंबट ढेकर येणे.
- पोट फुगल्याप्रमाणे गच्च वाटणे.
- घशात अन्नाचे कण अडकणे.
- गिळताना त्रास होणे.
- डोके दुखणे.
GERD मुख्यत्वेकरून २ प्रकारचे असतात.
- शरीराच्या क्रियेत बिघाड झाल्यास पोटात अति प्रमाणात Acid स्रवल्यास.
- शरीराच्या रचनेत बिघाड झाल्यास जसे पोटाचा जठराचा भाग छातीच्या पोकळीत घुसणे (Hiatus Hernia) अथवा अन्ननलिकेच्या खालील भागातील स्नायू ढिला होणे Lax Los (Lower Esophageal Sphincter).
यापैकी क्र १ साठी औषधोपचार योग्य ठरतात परंतु क्र २ च्या कारणासाठी शस्त्रक्रिया व तत्सम उपचारांची गरज पडते.
आधुनिक विज्ञानानुसार जठरात पचन क्रिया होण्यासाठी HCI (हायड्रोक्लोरिक अॅसिड) व Pepsin यांचे स्रवण होते व हे पित्त जठरातच राहून पचनाचे कार्य करते. अन्ननलिकेच्या संपर्कात येत नाही. अन्ननलिका व जठर यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा स्नायू असतो (LES) जो केवळ घास गिळतांना उघडतो व इतर वेळी हा मार्ग बंद ठेवतो. परंतु जेव्हा यामध्ये काही विकृती निर्माण होते तेव्हा हे Acid अन्ननलिकेत येते व असे वारंवार होऊ लागले की अन्ननलिकेला सूज व जखमा होतात. म्हणून या छोट्याशा आजाराची परिणिती एखाद्या महाभयंकर आजारात होण्यापूर्वीच उपचार करून घेणे आवश्यक ठरते.
आता बघूया GERD च्या निदानासंदर्भात
GERD चे निदान कसे करतात ?
GERD चे निदान करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या तपासण्या केल्या जातात.
- Endoscopy/Gastroscopy: रूग्णाच्या तोंडावाटे एक छोटी नळी आत सरकवली जाते त्यात एक Micro camera असतो, ज्याद्वारे अन्ननलिका ते लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग बघितला जातो. गरज असल्यास याच Endoscope मधून काही भाग (Biopsy) तपासणी करिता काढून पाठविता येतो.
- pH Manometry : या तपासणीद्वारे जठरातील Acid ची तीव्रता किती आहे हे तपासले जाते. ही अत्याधुनिक तपासणी असून याद्वारे देखील अचूक निदान करता येते.
- Esophageal Manometry : याद्वारे अन्ननलिकेच्या हालचाली योग्य रितीने होत आहेत कि नाही तसेच अन्ननलिकेच्या खालच्या भागातील स्नायूची ताकद किती प्रमाणात आहे याचे निदान होते. ब-याचदा शस्त्रक्रिया करावी की नाही याचा निर्णय या तपासणीवर अवलंबून असतो.
- Barium Esophagogram : यामध्ये तोंडावाटे औषध पिण्यास देऊन रूग्णाचे X-ray काढले जातात. दिलेले द्रावणास अन्ननलिकेत कुठे अडथळा आल्यास ते पुढे जात नही व X-ray मधील रिपोर्टद्वारे निदान केले जाते.
औषधोपचार
अगदी सुरूवातीच्या अवस्थेत करणे योग्य.
या उपचार पध्दतीत रूग्णाची acidity तात्पुरती कमी करू शकतो परंतु वारंवार होणा-या reflux वर हा उपाय नाही.
शस्त्रक्रिया :
Reflux समूळ नष्ट करून hyperacidity वर कायमचा उपचार. ज्यांना वारंवार गोळ्या घेऊनही आराम मिळत नाही त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया हे सर्वोतम उपाय आहे.
- Nissen’s Fundoplication.
- Toupet Posterior Partial Fundoplication.
- Dor. Anterior Partial Fundoplication.
- Belsey Mark Iv Fundoplication.
या सर्व शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. यापैकी सर्वाधिक वापरली जाणारी शस्त्रक्रिया म्हणजे Nissen’s Fundoplication होय.
Nissen’s Fundoplication : ही शस्त्रक्रिया Hiatus Hernia साठी प्रामुख्याने करतात. यामध्ये छातीच्या पोकळीत घुसलेला जठरचा भाग खाली पोटाच्या पोकळीत आणतात, त्याचबरोबर छाती व पोटाच्या पटलावरील छिद्र लहान केले जाते व शिवले जाते व शेवटी जठराचा जो भाग छातीच्या पोकळीतून खाली आणलाय त्याला अन्ननलिकेशी गुंडाळून शिवले जाते. या प्रकारच्या शस्त्रक्रियेद्वारे GERD च्या मूळ कारणावरच भर दिला जातो. यामुळे रूग्णाची acidity कायमची थांबते व वारंवार ढेकर येणे बंद होते. हा १०० % खात्रीशीर उपाय ठरतो.
शस्त्रक्रियेनंतरची काळजी :
- रूग्णाला २ ते ३ दिवस हॉस्पिटल मध्ये रहावे लागते.
- पहिले ८ दिवस पातळ अन्न खावे.
- नंतरचे ८ दिवस मऊ अन्न खावे.
- त्या नंतरचे १५ दिवस पूर्ववत आहार सुरू करणे.
Hyper-Acidity कडे दुर्लक्ष केल्यास :
वास्तविक पाहता बहुतेक लोक Acidity कडे दुर्लक्ष करतात. मेडिकलवरून तात्पुरत्या गोळ्या घेतात व Acidity शमविण्याचा प्रयत्न करतात. पण खरे तर छोटासा दिसणारा हा आजार पुढे किती मोठे रूप धारण करतो याची कल्पना दुष्परिणामांकडे पाहिल्यास लक्षात येते.
समजा एखाद्याने Hyper-Acidity कडे वारंवार दुर्लक्ष केले व योग्य वेळीच उपचार घेतले नाहीत तर खालील परिणाम दिसतात –
- अन्ननलिकेला सूज
- अन्ननलिकेच्या भिंतीवर जखमा, अल्सर,
- अन्ननलिकेचे तोंड आकुंचन पावणे.
- अन्ननलिकेचा कॅन्सर.
- रक्तक्षय
- स्वरसंचाला सूज व जखमा.
या अवस्थेत हा आजार उपचार करण्यास असाध्य बनत जातो.
अशाप्रकारे आज आपण Hyperacidity वा GERD बद्दल महिती बघितली. रूग्णांना माझा हाच सल्ला असेल की acidity कडे दुर्लक्ष करू नये व योग्य वेळीच तपासण्या करून घ्याव्यात जेणेकरूण हा आजार अजून मोठा होणार नाही.
लोकांच्या मनात नेहमीच प्रश्न असतो की, खरोखर surgery ची गरज आहे काय? तर यावर माझे म्हणणे असे आहे की औषधांनी केवळ तात्पुरता आराम मिळेल परंतु ज्यांना वारंवार लक्षणे दिसतात व गोळयांनी विशेष फरक पडत नाही त्यांनी नक्कीच surgery करून घ्यावी. हाच सुरक्षित व विश्वसनीय उपाय आहे.